दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर -वारकरी संप्रदाय हाच सर्वश्रेष्ठ संप्रदाय असून यात तीर्थ, ग्रंथ, मंत्र ,परंपरा यासह मानवी जातीला जे हवे आहे ते सर्व आहे, असा उपदेश ह. भ. प. झगरे गुरुजी वाकदकर यांनी भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव सुतार येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात तिसरे पुष्प गुंफताना केला. प्रत्येकाने संत विचार जोपासून, आई-वडिलांची आणि समाजाची प्रमाणिकपणे सेवा करावी, असे आवाहन ह.भ .प. झगरे गुरुजी यांनी ग्रामस्थांना केले.

यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की मनुष्याला आजकाल स्वतःकडे पाहण्यास वेळ नसतो. मात्र तो दुसऱ्याचे स्टेटस मोबाईल ठेवतो. त्यामुळे दुसऱ्याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःला वेळ द्या. आपल्याला अनमोल मनुष्य जन्म मिळाला असल्याने त्याचे सोने करा.संतांनी सर्वच क्षेत्रात मानव जातीला मार्गदर्शन करण्यासाठी अमुलाग्र असे वचन त्यांच्या संत साहित्यातून मांडलेले आहेत त्याचा मानव जातीने विचार करावा आणि त्यासोबतच आपल्याला जन्म देणाऱ्या आई-वडिलांची प्रमाणिकपणे सेवा करा. घराबाहेर पडताना आई-वडिलांना विचारल्याशिवाय घराबाहेर पडू नका. असे सांगून आई-वडिलांची सेवा करा. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आपल्या अपत्यासाठी काबाडकष्ट करून काळजी घेतलेली असते व व्यसनापासून दूर राहण्याचे संदेश दिला.

ज्यांच्या आयुष्यामध्ये सद्यस्थितीत आईबाप नाही आहेत तरी त्यांनी अनाथ न राहता संत विचार जर जीवनात अवतरले तर त्यांना नक्कीच माऊलींचे विचार प्रेमाचा पान्हा पाजणारे आहेत असे गौरवोद्गार त्यांनी काढले.आजचे तरुण हे उद्याची राष्ट्राची संपत्ती असून त्याला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, असा मोलाचा सल्ला उदाहरणासह दिला. यावेळी पंचक्रोशीतील महिला,पुरुष, तरुण मंडळींची भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
