दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजुर: संतपरंपरा आणि विविध उत्सवांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात प्रत्येक सणाला एक विशेष कौटुंबिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व आहे. गणेशोत्सवातील ऐक्याची भावना, दिवाळीचा प्रकाशोत्सव, आषाढीची वारकरी भक्ती व शिस्त, गुढीपाडव्याचा उत्साह, शिवजयंतीची स्फूर्ती, आणि ईद व ख्रिसमसच्या माध्यमातून जपला जाणारा सामाजिक सलोखा हे आपल्या संस्कृतीचे सौंदर्य आहे. सण-उत्सव हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून सामाजिक सलोखा आणि मानवी मूल्ये जोपासण्याचे माध्यम आहेत. मात्र हल्ली सणांच्या काळात मद्यपान व अमली पदार्थांचा वापर वाढताना दिसतो, ज्यामुळे सणांचे पावित्र्य धोक्यात येत आहे. हे चित्र बदलण्यासाठी ‘नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य’ व ‘सहारा सामाजिक विकास संस्था, जालना’ यांच्या संयुक्त विद्यमाने उत्सव काळात सातत्याने प्रबोधन केले जाते. याच उपक्रमाचा भाग म्हणून आणि केंद्र सरकारच्या ‘नशा मुक्त भारत अभियानाला’ साथ देण्यासाठी यंदाचा गणेशोत्सव जालना जिल्ह्यात पूर्णपणे नशामुक्त वातावरणात पार पडावा, असा संकल्प करण्यात आला आहे.
यासाठी जिल्ह्यातील सर्व गणेशोत्सव मंडळे, डी.जे. चालक आणि मिरवणूक प्रमुखांनी उत्सवादरम्यान कोणतीही नशा होणार नाही, याची दक्षता घेऊन पूर्वनियोजन करावे. जालना जिल्ह्याचे संघटक व सामाजिक कार्यकर्ते बी.एस. सय्यद यांनी सर्व नागरिक आणि विशेषतः तरुणाईला हा उत्सव ‘आरोग्यदायी, नशामुक्त आणि सामाजिक उत्तरदायित्व जपणारा’ म्हणून साजरा करण्याची विनंती केली आहे.
