दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
जालना- विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य निरोगी राहण्यासाठी व्यायामाची फार आवश्यकता असते.विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासुनच व्यायामाची गोडी निर्माण व्हावी म्हणून अंबड येथील मत्स्योदरी विद्यालयात सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे दिसून आले.

मत्स्योदरी विद्यालयातील इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या 1720 विद्यार्थी आणि नववी ते दहावी पर्यंतच्या 1250 विद्यार्थी अशा एकूण दोन हजार 970 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांने आठरा सूर्यनमस्कार काढून एकुण सर्व विद्यार्थ्यांनी 53 हजार 460 एवढे सूर्यनमस्कार केले.या स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या दोनशे चाळीस विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धे करिता निवड करण्यात आली.

या स्पर्धेसाठी जालना येथील योग शिक्षक श्रीमती शिल्पा शेलगावकर,श्रीमती मिरा थोरात, देवा चित्राल यांनी सर्वप्रथम सुरवातीस विद्यार्थ्यांकडून पूर्व तयारी म्हणून सुक्ष्म व्यायाम म्हणजेच वार्मअप सारख्या शारीरिक क्रिया करुन घेतल्या.क्रीडा शिक्षकांनी योगिक प्रार्थना,संगित नृत्य आणि योगिक हालचालीद्वारे शाळेतील शिक्षक व विद्यार्थी आणि उपस्थितांचा आनंद द्विगुणित केला होता.त्यामुळे सहभागी विद्यार्थांनी स्पर्धेत मंत्रमुग्ध होऊन सक्रिय सहभाग घेतला.
योग शिक्षाकांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने 12 अंकाचा एक याप्रमाणे मंत्रोच्चारा,कलात्मकता व श्वसनाच्या नियमानुसार सूर्यनमस्कार करुन घेतल्याने शेवटच्या क्षणापर्यंत सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह टिकून राहण्यास मदत झाली.नारयण तिकांडे यांनी स्पर्धेस भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी मुख्याध्यापक-अरविंद देव,शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
