दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर-
नुकतीच सन २०२३ या नवीन वर्षाला सुरुवात झाली.या वर्षात काय करायचे याची संकल्पना प्रत्येकाच्या मनात असते.म्हणून नववर्षाचे स्वागत आपण नवसंकल्पनेतून करत असतो.समाजीक भान ठेवत राजुर व परिसरातील काही सामाजिक कार्यकर्ते,शिक्षक,शेतकरी,व्यापारी व महिला यांच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या प्रारंभी पळसखेड सपकाळ येथील सेवा संकल्प या मनोरुग्णाच्या आश्रमास २३ क्विंटल गव्हाचे संकलन करून प्रकल्पाचे संचालक डॉ.नंदकिशोर पालवे यांच्याकडे सुपूर्द केले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील व चिखली तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथे सेवा संकल्प नावाने मनोरुग्ण आश्रम चालू आहे .प्रकल्पाचे संचालक नंदकिशोर पालवे आणि त्यांच्या पत्नी सौ. पालवे हे दाम्पत्य जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची प्रेरणा घेऊन मनोरुग्णांची सेवा करतात.या प्रकल्पात १९०पेक्षा जास्त मनोरुग्न आहेत.ज्यांना रक्ताच्या नात्याने नाकारलं,ज्यांना लोकांनी आयुष्यात धोका दिला ,जे रस्त्यावर उघडे-नागडे फिरतात आणि ज्यांच्या पायामध्ये आळ्या पडलेल्या आहेत अशा सर्व रुग्णांचा पालवे दाम्पत्याने आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ केला आहे.

राजूर परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते या आश्रमाशी जोडले गेले आहेत या सामाजिक कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून राजूर परिसरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सेवा संकल्प प्रकल्पातील अनाथ,निराधार लोकांना मदत करण्याचे ठरविले.त्यातूनच प्रत्येकाने दहा किलो धान्य जमा करण्याची संकल्पना सुचली.यामध्ये १६९पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेऊन २३क्विंटल गव्हाचे संकलन केले आहे.

ठरल्याप्रमाणे नवीन वर्षाच्या प्रारंभी राजुरेश्वराच्या पायथ्याशी श्री खडेश्वरी बाबा यांच्या हस्ते नारळ फोडून २३ क्विंटल गव्हाच्या धान्याच्या गाडीची पूजा करून पळसखेड सपकाळ येथीलआश्रमाकडे पाठवण्यात आले.

सेवा संकल्प आश्रमातील निराधार, बेघर व ज्यांना रक्ताच्या नात्यातील लोकांनी सोडून दिले आशा मनोरुग्णांसाठी निस्वार्थी भावनेतून व सर्वांच्या प्रयत्नातून आपण २३ क्विंटल धान्याची मदत गरजूपर्यंत पोहचवून नवीन वर्षाची सुरवात सेवा कार्यातून करू शकलो याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. सेवा संकल्प प्रकल्पास धान्यस्वरूपात मदत केली म्हणून डॉ.नंदकिशोर पालवे यांनी सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानले.
