दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर: महाराष्ट्र गोलबॉल असोसिएशनच्या वतीने 25 ते 28 डिसेंबर दरम्यान गोंदिया येथे राष्ट्रीय ब्लाइंड गोलबॉल महिला चॅम्पियन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भोकरदन तालुक्यातील व राजूरपासून जवळ असलेल्या गव्हाण संगम येथील दिव्यांग विद्यार्थिनी प्रतीक्षा कारभारी कदम हिने सांघिक खेळात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तिच्या नेतृत्वाखाली संघाने या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाचे स्थान पटकावले.इच्छाशक्तीच्या बळावर अंधत्वावर मात करत प्रतीक्षा कदम हिने या स्पर्धेत घवघवीत यश मिळविले आहे.त्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

प्रतीक्षा ही सामान्य कुटुंबातील मुलगी आहे.जन्मजात शंभर टक्के अंधत्व आल्याने तिने पहिल्या वर्गापासूनच ब्रेल लिपीतून शिक्षण घेतले.ती सध्या मुंबई येथील कमला मेहता ब्लाइंड स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत आहे. अभ्यास बरोबरच खेळांचीही तीला आवड आहे.या अगोदर तिने दिव्यांग मॅरेथॉन स्पर्धे दमदार कामगिरी केलेली आहे.
नुकत्याच गोंदिया येथे झालेल्या राष्ट्रीय ब्लाइंड महिला गोलबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाला तिने चॅम्पियनशिप मिळून दिली आहे.भविष्यात देशपातळीवर क्रीडा स्पर्धेचे नेतृत्व करण्याचा तिचा मानस आहे.जिद्द आणि कठोर परिश्रमातुन प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश मिळवता येते हे तिने दाखवून दिले आहे.

यावेळी आयबीएसए सरचिटणीस श्री.ए.डेव्हिड,अर्जुन पुरस्कार विजेते ऋषिकेश शर्मा,पहिले दृष्टीहीन आयएएस अधिकारी आर.के.सिंग,झारखंडचे डीएम राजेश सिंग, राजकुमार कुथे, प्रकाश गुप्ता, विजय नाईक,प्रतिभा यादव, आदी मान्यवरांचे उपस्थितीत प्रतीक्षा कदम हिस स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
याकामी तिला प्रशिक्षक आरती लिमजे,व्यवस्थापक सुवर्ण जोशी,कर्णधार कल्पना कदम, निकिता डोंगरे,कुशावर्ता सपकाळ, तेजस्विनी ससे, सुरुची गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले.
