दर्पण सह्याद्री न्यूज

श्रीक्षेत्र राजुर

मागील आठवड्यात जालना, बीड, परभणी जिल्ह्यात मानवी मनाला हेलावून टाकणाऱ्या काही घटना घडली आहेत. या घटनेमुळे सर्वसामान्य माणसांच्या मनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.प्रत्येकजण आपापल्या परीने या घटनेंचा निषेध करत आहे.परंतु भोकरदन तालुक्यातील राजुर येथे सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी एकत्रित येऊन अंबड,मस्साजोग, परभणी येथील अमानवी कृत्यांचा जाहीर निषेध करून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी पोलिसांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

अंबड येथे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने रोडरोमिओंच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे.या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून खबरदारी घेणे गरजेचे आहे असे निवेदनात म्हटले आहे .

दुसरीकडे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान प्रतिकृतीची मोडतोड करून अवमान केल्याची घटना परभणी येथे घडली असून दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करून या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला.

त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे भरदिवसा अपहरण करून क्रूर पद्धतीने निर्घृण हत्या करण्यात आली.ही घटना मन हेलावून
टाकणारी घटना आहे. देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

जालना,बीड,परभणी येथे घडलेल्या घटनांच्या निषेधार्थ सर्व समाज बांधवांनी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन करत हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय आहिरे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी भीमाशंकर दारूवाले, पद्माकर चंदनशिवे ,कैलास गाबळे ,गजानन सानप ,दीपक घुगे,संतोष पुंगळे,प्रमोद कांबळे ,बबन मगरे, मिलिंद मगरे, ज्ञानेश्वर बोर्डे,रहीम शेख,अन्वर शहा, दयानंद पवार ,प्रल्हाद तायडे ,शिवाजी तायडे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!