दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा. बाळासाहेब बोराडे
जालना: मंठा तालुक्यात मागील चोवीस तासात अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आल्याने मंठा शहरात अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.संततधार पावसामुळे आंभोडा कदम येथील शेतशिवार जलमय झाले असून अनेक घरांची पडझड झाली आहे. तर पांगरी खुर्द येथील पाझर तलाव पूर्णपणे भरल्याने नागरिकांना महादेव मंदिर आणि उंचावर असलेल्या शेजारील वस्तीवरील कॅम्पसमध्ये सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.जिल्हाधिकारी डॉ.कृष्णा पांचाळ यांनी नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेतला असून परिस्थिवर लक्ष ठेवून आहेत.पुढील काही काळ नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मंठा शहरात शिरले पाणी
तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने मंठा शहरात मुख्य रस्त्याने सर्वदूर पाणीचपाणी झाले होते. अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. वस्त्यांमध्ये पाणी साचले होते. वाहने पाण्यामध्ये अडकली होती.तालुक्यातील अनेक गावांत पुरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
अंभोडा कदम गावातील शेतशिवार जलमय
मंठा तालुक्यातील अंभोडा कदम गावात मागील चोवीस तासापासून संततधार पाऊस पडतो आहे.नदी-नाल्याना पूर आल्याने गावात पाणी शिरले आहे.घरांची पडझड झाली आहे. गावचे शेतशिवार संपूर्ण जलमय झाले आहे.खरीप हंगामातील पिकांवर पाणी फिरल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
पांगरी खुर्द नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले
मंठा तालुक्यातील पांगरी खुर्द येथील पाझर तलाव पूर्ण भरल्यामुळे नागरिकांना कॅम्पसमध्ये व उंचावर असलेल्या महादेव मंदिर व शेजारील वस्तीवर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.वयोवृद्ध व्यक्ती आणि जनावरे यांनाही सुरक्षित स्थळी हलवले आहे.प्रशासन परिस्थितीवर लक्षठेवून आहे.
जिल्हा प्रशासनाकडून सतर्क रहाण्याचे आवाहन
मागील 24 तासात जिल्यात मुसळधार पाऊस कोसळला आहे.मंठा तालुक्यातील अनेक गावांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली असून पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.नैसर्गिक आपत्तीमध्ये कुठेही जीवितहानी होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून त्यांवर लक्ष ठेवून आहेत.पुढील काही काळ सावध रहाण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
