दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजुर : वृक्ष ही निसर्गाने दिलेली अनमोल भेट आहे. परंतु माणूस हे विसरतोय.विकासाच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड झाल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे.सूर्य आग ओकत आहे.या संकटातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करणे हा होय. त्यासाठी सेवाभावी व पर्यावरण संस्था,वृक्षमित्र,जागरूक नागरिक प्रयत्न करत आहेत.या उपक्रमात आपलाही थोडा सहभाग असावा म्हणून प्रा.बाळासाहेब बोराडे यांनी ग्रामस्थ व्यापारी व बसस्थानक कर्मचारी सहकार्याने लॉकडाऊनच्या काळात राजूर बसस्थानक परिसरात वृक्षरोपण केले होते. आजमितीला ही झाडे चांगलीच बहरली असून भविष्यात प्रवाशी,नागरिकांना थंडगार सावली देणार आहेत.या उपक्रमाची प्रेरणा घेऊन येत्या पावसाळ्यातही वृक्षारोपण करणार असल्याचे मत प्रा.बोराडे यांनी व्यक्त केले.
राजुर बस स्थानक परिसरात लॉकडाऊनमध्ये लावलेल्या झाडांची काल पाहणी करून झाडांच्या बुंध्याशी स्वच्छता करण्यात आली.मागील चार वर्षापासून ही झाडं परिसरात राहणारे नागरिक, व्यवसायिक आणि बसस्थानक कर्मचारी यांची देखरेख व निगराणीत वाढली आहेत. हिरवीगार झाडे बहरलेली पाहून सर्वांना याचे समाधान वाटले.येत्या काळात वृक्षरोपण करणार असल्याचा संकल्प उपस्थित नागरिकांनी केला.यावेळी प्रा.बाळासाहेब बोराडे,राजूर वाहतूक नियंत्रक विनोद पवार,रमेश फलके,रामदास बनकर,मुकुंद साबळे, गजानन बावणे, दत्ता डवले,अनिल डवले,राजेश पुंगळे आदीजन उपस्थित होते.

वृक्षारोपण व संवर्धनासाठी जनजागृती आवश्यक-प्रा.बोराडे

बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला. वाढत्या तापमानामुळे सजीवसृष्टी धोक्यात आहे. धरती मातेला वाचवण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धनाशिवाय पर्याय नाही.त्यासाठी पर्यावरण संस्था,वृक्षमित्र प्रयत्न करत आहे. या उद्देशानेच राजूर बसस्थानक परिसरात वृक्षारोपण केले होते.ती झाडे आज सुंदरपणे बहरली आहे.उद्याचे भविष्य उज्ज्वल राहण्यासाठी नागरिकांनी या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करावे. त्यासाठी विविध पातळीवर जनजागृती करणार आहोत.
प्रा.बाळासाहेब बोराडे राजुर, सामाजिक कार्यकर्ते
