दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा. बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर:सण,उत्सव म्हटलं की आपल्या आनंदाला पारावर राहत नाही.परंतु याच उत्सवात पोलीस दादांचा ताण वाढतो.लगतच्या काळात पोळा,गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद यासारखे सण एकापाठोपाठ आल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचारी बंदोबस्तमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले.सततच्या बंदोबस्तमुळे पोलिसांवर शारीरिक आणि मानसिक ताण पडतो.परंतु प्रचंड तनावतही पोलीस विरंगुळा शोधण्याचा प्रयत्न करतो. फावल्या वेळात तणाव दूर सारून पोलीस दादा आनंद लुटत असतात.याची प्रचिती काल भोकरदन तालुक्यातील राजूर येथे बैलपोळा सणानिमित्त आली. बैलपोळ्या निमित्त अनुचित प्रकार घडू नये म्हणून हसनाबाद पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.कर्तव्य बजावत हसनाबाद पोलिसांनी राजूर येथील ग्रामस्थांमध्ये सहभागी होऊन पोळा सणांचा मनमुराद आनंद लुटला.
सध्या जालना जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे.आंदोलकांवर लाठीहल्ला झाल्यामुळे जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण आहे.अनेक ठिकाणी धरणे,आंदोलने चालू आहेत. त्यातच राज्यातील प्रमुख व्यक्ती आरक्षण स्थळी जाऊन आंदोलनकर्त्यास भेटी देत आहेत.त्यामुळे बंदोबस्तसाठी बराच फौजफाटा तिकडे गुंतला आहे. अशातच पोळा,गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद यासारखे सण तोंडावर आले आहेत.मुळातच पोलिसांचे मनुष्यबळ कमी असल्याने पोलीस दादांचा ताण अधीकच वाढला आहे.
सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नुकतीच हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनानुसार व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. जी. एस.दराडे यांच्या अध्यक्षतेखाली राजूर येथे शांतता समितीची बैठक पार पडली. त्यानुसार सपोनि नागवे यांनी आपल्या हद्दीतील गावांमध्ये पोळ्यानिमित्त चोख बंदोबस्त लावला होता.
काल हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये पोळा सण शांततेत पार पडल्याचे दिसून आले.
शेवटी हसनाबाद पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना पोळा साजरा करण्याचा मोह आवरला नाही. पोलिसांनी राजुर येथील ग्रामस्थांसोबत हातात बैल धरून पोळा सण साजरा करत आनंद लुटला.दैनंदिन जीवनातील तणावातही आनंदी क्षण कसे निर्माण करायचे हे पोलिसांच्या एका छोट्याशा कृतीतून दिसून आले.यावेळी हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे, फौजदार शिवाजी देशमुख, जनार्धन भापकर,दीपक सोनुने,नरहरी खार्डे,राहुल भागीले,राजेंद्र पवार,राजू वाघमारे,रवींद्र राठोड, नारायण सरवंडे,निलेश खरात, प्रकाश बोराडे,भिवसने,डुकरे आदी जणांनी चोख बंदोबस्तचे कर्तव्य पार पाडले.
