दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
निसर्गकवी ना.धो.महानोर यांचे दुःखद निधन; पळसखेडची माती पोरकी झाली-डॉ. विष्णू सुरासे
छत्रपती संभाजीनगर
ज्यांच्या ग्रामीण..निसर्ग कवितेने मराठी कवितेचा प्रांत ख-या अर्थाने समृद्ध केला..ज्यांच्या लेखणीने हिरव्या बोलीला शब्द दिले…ते निसर्गकवी..ना.धो.महानोर..यांनी आज शेवटचा श्वास घेतला…पळसखेडची माती आज पोरकी झाली..आज त्या मातीलाही हुंदके दाटून आले असतील..शेतक-याच्या कुटुंबात जन्माला आलेले..गरिबीचे चटके सहन करत करत ज्यांनी कष्टाची पाऊलवाट समृद्ध केली..अन एक रानात जन्माला आलेला शेतक-याचा पोरगा मराठी साहित्य सृष्टीवर अधिराज्य गाजवू शकतो हे दाखवून दिले..ज्या काळात प्रसिद्धीचं फारसं साधन उपलब्ध नव्हतं वर्तमानपत्र .नियतकालिकं मासिकं दिवाळीअंक यातच कविता प्रकाशित व्हायच्या अशा आव्हानात्मक काळात कवी ना.धो.महानोर यांनी आपल्या रानातली कविता महाराष्ट्रातील,देशातील वाचकांच्या हाती पोहचवली.वाचकांनीही त्यांच्या कवितेवर जिवापाड प्रेम केलं.वही,रानातल्या कविता,तिची कहाणी अशा अनेक कवितासंग्रहानी मराठी कवितेचा प्रांत समृद्ध केला.मला आठवतं मराठवाडा साहित्य परिषदेत एका कार्यक्रमासाठी ते आले होते.एकजण माझी त्यांच्या सोबत ओळख करून देत असतानांच ते म्हणाले मी ओळखतो या शेतक-याच्या पोराला..वर्तमानपत्रात वाचलय याचं लेखन.मातीवर छान लिहितो हा .मला तर धक्काच बसला.त्यांनी पाठीवरून हात फिरवला अन म्हणाले लिहित रहा.आज त्यांच्या जाण्याने रानातली कविता पोरकी झाली.एक वर्षापूर्वी मी त्यांच्याशी फोनवर बोललो तेंव्हा ते जळगावला होते..पळसखेडला आलो की मग या ..पण भेट अधुरीच राहिली…!!!
निसर्गकवी- ना.धो.महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली..
डाॅ. विष्णू सुरासे …..!!!
