दर्पण सह्याद्री न्यूज
पुणे, दि. २४ जुलै -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदनदास देवी (वय ८१ वर्षे) यांचे सोमवार (२४ जुलै) रोजी पहाटे बंगळुरू येथे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते घरीच होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार (25 जुलै) रोजी सकाळी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
देवी यांच्या निधनावर सरसंघचालक मा. मोहन भागवत आणि सरकार्यवाह मा. दत्तात्रेय होसबाळे यांनी शोकसंदेश पाठविला आहे. “मदनदासजी यांच्या जाण्याने आमचा ज्येष्ठ सहकारी गमावला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या शारीरिक अस्वास्थ्याशी त्यांचा संघर्ष सुरू होता. आज पहाटे त्यांच्या या संघर्षाचा आपल्या सर्वांसाठी अत्यंत दुःखद अंत झाला आहे. श्री. मदनदासजी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत संघ योजनेतून देण्यात आलेले पहिले प्रचारक होते. अनेक वर्षे त्यांनी परिषदेचे संघटनमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. स्वर्गीय श्री. यशवंतराव केळकरजी यांच्या सहवासात त्यांनी संघटनकलेच्या गुणवत्तेला परिपूर्ण रूप दिले,” असे या संदेशात म्हटले आहे.
आदरणीय मदनदासजी देवी यांचा जन्म 9 जुलै रोजी झाला. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे त्यांचे मूळ गाव. शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयात त्यांनी 1959 मध्ये प्रवेश घेतला. एम. कॉमनंतर आयएलएस लॉ कॉलेजमध्ये सुवर्णपदकासह एलएलबीची परीक्षा उत्तीर्ण केली. राष्ट्रीय स्तरावर रँक मिळवत त्यांनी सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण केली.
पुण्यात शिक्षण घेत असतानाच वरिष्ठ बंधू खुशालदास देवी यांच्या प्रेरणेने त्यांचा रा. स्व. संघाशी संबंध आला. मदनदास देवी यांनी बालपणापासूनच आपले आयुष्य राष्ट्रसेवा आणि संघकार्यासाठी वाहून घेतले. आयुष्यातील जवळपास 70 वर्षे त्यांनी संघाच्या प्रचारासाठी काम केले. दैनंदिन शाखेतील स्वयंसेवकापासून सह सरकार्यवाह असा त्यांचा प्रवास झाला.
ते 1969 पासून संघ प्रचारक होते. अभाविपमध्ये त्यांनी 1975 पासून कामास सुरूवात केली. तेथे ते विभाग, प्रदेश व क्षेत्रीय अशा जबाबदाऱ्यांनंतर त्यांनी अ.भा. संघटन मंत्री म्हणूनही काम केले. महाविद्यालय- शहर पातळीवर संस्कारित कार्यकर्ता समूह उभा राहील यासाठी विशेष लक्ष देत त्यांनी संघटनकार्याचा पाया रचला. अनेक समर्पित कार्यकर्त्यांच्या पिढ्या त्यांनी घडविल्या.
मंगळवारी पुण्यात अंत्यसंस्कार
मदनदासदेवी यांचे पार्थिव सोमवारी रात्रीपर्यंत पुण्यात आणण्यात येईल. मंगळवारी सकाळी ९ वाजल्यापासून ११ वाजेपर्यंत पार्थिव मोतीबागेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर 11.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सरसंघचालक मा. डॉ.मोहन भागवत आणि सरकार्यवाह मा. दत्तात्रेय होसबाळे यावेळी उपस्थित राहतील.
▪️मा. पंतप्रधान शोकसंदेश ▪️
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे, की श्री. मदनदास देवीजी यांच्या देहावसानामुळे अत्यंत दुःख झाले आहे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले. त्यांच्याशी माझे केवळ घनिष्ठ संबंधच नव्हते, तर त्यांच्याकडून मला खूप काही शिकायलाही मिळाले. दुःखाच्या या प्रसंगी ईश्वर सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांना बळ देवो. ओम शांति!
