दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
जालना :सध्या खरिपाच्या पेरणीच्या मोसम चालू आहे. त्यामुळे शेतकरी शेती कामात व्यस्त आहेत.असाच एक शेतकरी आपल्या कुटुंबासह शेती कामात व्यस्त असताना अचानक शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला चढवला.यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झाला असून ग्रामस्थांच्या मदतीने जखमी शेतकऱ्यास जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.भारत दत्तात्रय बोराडे असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना मंठा तालुक्यातील आंभोडा कदम येथील शिवारात घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून वन विभागाने तात्काळ रानडुकरचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
सविस्तर माहिती अशी की आंभोडा कदम येथील शेतकरी भारत दत्तात्रय बोराडे (३८) हे नेहमी प्रमाणे आपल्या पत्नी सोबत शेतात गेले होते.दुपारी एकच्या सुमारास काही कुत्री रानडुकराचा पाठलाग करत होती.रानडुक्कर आपला जीव वाचवण्यासाठी वेगाने पुढे पळत होते.शेतकरी भारत बोराडे ज्या ठिकाणी काम करत होते त्याच दिशेने डुक्कर येत होते.
रानडुक्कर अंगावर धावून येताच शेतकऱ्याने आपल्या हातातील कुऱ्हाडीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.परंतु तेवढ्यात डुकराने भारत बोराडे यांच्यावर हल्ला चढवला. डुकराने शेतकऱ्याच्या मांडीला चावा घेतल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन शेतकरी गंभीर जखमी झाला. सुदैवाने जखमी शेतकऱ्याची पत्नी मीराबाई बोराडे ह्या या हल्ल्यातून बालबाल बचावल्या.परिसरातील शेतकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने जखमी अवस्थेतील शेतकऱ्यास मंठा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले.तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमी शेतकरी भारत बोराडे यांस जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.नातेवाईकाकडून मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांची तब्येत स्थिर असून ती पूर्वपदावर येत असल्याचे म्हटले जात आहे.
अलीकडच्या काळात आंभोडा कदम शिवारात रानडुकराने हैदोस घातला आहे.त्यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असून शेतकऱ्यांस मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.भरदिवसा मानवी वस्तीत रानडुकरे वावरताना दिसत असल्याने जीवाला धोकाही निर्माण झाला आहे. शेतकऱ्यास आपल्या कुटुंबासह लहान मुलांना सोबत घेऊन शेतात जावे लागते. परंतु रानडुकराने केलेल्या हल्ल्यामुळे परिसरात भीती पसरली आहे.वन विभागाने रानडुकराचा तात्काळ बंदोबस्त करून शासनाने जखमी शेतकऱ्यास आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
