दर्पण सह्याद्री न्यूज
निसर्ग आणि माणूस यांच्यावर आस्था असेल तरच साहित्य निर्माण होते-डॉ.अरुणा ढेरे
डॉ.विक्रम लोखंडे लिखित’वन पेज स्टोरी’पुस्तकाचे प्रकाशन
प्रा.बाळासाहेब बोराडे
छत्रपती संभाजीनगर- जीवन जगताना अनेक छोटे छोटे संवेदनशिल अनुभव आपल्याला समृध्द करत असतात.हे अनुभव वेचायचे असतात.डॉ.विक्रम लोखंडे यांनी हे अनुभव अलगद चिमटीत उचलून’वन पेज स्टोरी’च्या माध्यमातून मांडले आहेत.त्यामुळे यातून डॉक्टरमधील माणूस लक्षात येतो.त्यांच्या प्रत्येक कथेतून माणुसकीचे दर्शन घडते.प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक नवीन गोष्ट असते.निसर्ग आणि माणसाविषयी आस्था असेल तरच साहित्य निर्माण होत असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका आणि कवियत्री डॉ.अरुणा ढेरे यांनी केले.डॉ.विक्रम लोखंडे लिखित’वन पेज स्टोरी’या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभाच्या प्रसंगी त्या बोलत होत्या.

एमजीएम महाविद्यालयाच्या रुख्मीणी सभागृहात प्रकाशन समारंभ पार पडला.यावेळी कार्यक्रम अध्यक्षा जेष्ठ लेखिका तथा कवयित्री डॉ.अरुणा ढेरे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून भोकरदनचे आमदार संतोष पाटील दानवे,प्रसिध्द लेखक आणि पटकथाकार अरविंद जगताप,साकेत प्रकाशनचे बाबा भांड,साकेत भांड यांची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात डॉ.अरुणा ढेरे म्हणाल्या की,डॉ.विक्रम लोखंडे यांचे लिखाण केवळ हौसेपोटी केलेले आहे असे कुठेच वाटत नाही.डॉक्टरीपेशात असताना अनेक अनुभव येत असतात त्यातून समृध्दता येते हीच समृृध्दता त्यांच्या लिखाणातून सतत जाणवत राहते. त्यांनी एका पानात मांडलेल्या कथा जिवनानुभव देतात.एक लेखक म्हणून जीवनाच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न त्यांच्या कथेमधून जाणवतो असेही डॉ.अरुणा ढेरे म्हणाल्या.
डॉ.विक्रम लोखंडे यांच्या लिखाणात सृजनशीलता-बाबा भांड

प्रास्ताविकपर भाषणात साकेत प्रकाशनचे बाबा भांड यांनी कथा संग्रहाचा हा नवा प्रकार प्रकाशक म्हणून खूप भावला असे प्रतिपादन केले.प्रत्येक क्षेत्रात ग्रंथांचे महत्त्व असते. त्यामुळे लेखक व ग्रंथांना आदर मिळतो.साहित्य, कला,संस्कृती ही राष्ट्राची संपत्ती आहे.डॉ. लोखंडे हे वैद्यकीय क्षेत्रातील एक नामांकित सर्जन आहेत. परंतु त्यांचे लिखानही तेवढच सृजनशील असल्याचे मत बाबा भांड यांनी व्यक्त केले.
मानवी नात्याची वीण उलगडून दाखवण्याचा प्रयत्न- अरविंद जगताप

डॉ.विक्रम लोखंडे यांनी मानवी जिवनातील नात्यांची वीण पुस्तकाच्या माध्यमातून उलगडून दाखवली आहे असे सांगून त्यांच्या लिखाणातून माणसं जिवंत होतात असे प्रतिपादन प्रसिद्ध पटकथा लेखक तथा कथाकार अरविंद जगताप यांनी केले.जेष्ठ साहित्यीक आणि समाजाने नवलेखकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. प्रोत्साहन न दिल्याने लेखक आणि वाचक निराश होतो.वाचन संस्कृती टिकली पाहिजे. माणसाला समजून लेखन व्हायला हवे. डॉ. लोखंडे यांच्या कथा अप्रतिम आहेत असेही अरविंद जगताप म्हणाले.
डॉ.लोखंडे यांच्या कथेला नैतिकतेचे अधिष्ठान-आ.संतोष दानवे

आमदार संतोष दानवे म्हणाले की लोकप्रतिनिधी म्हणून रोजच भाषणे करावी लागतात परंतु आजचा कार्यक्रम वेगळा आहे याची मला जाणीव आहे.’वन पेज स्टोरी’या पुस्तकातून दैनंदिन जीवनातील अनुभव आणि सामान्य माणसाच्या आयुष्यातील भाव-भावना चित्रित झाल्याचे दिसून येते. प्रत्येक कथेला एक नैतिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. आमच्या परिवारातील एका सदस्यांने हे पहिलेच पुस्तक लिहिलं याचा मला आनंद होतोय असे मत आमदार संतोष दानवे यांनी व्यक्त करून डॉ.लोखंडे यांना शुभेच्छा दिल्या.
साहित्यामुळे आयुष्य सुधारण्यास मदत होते-डॉ. विक्रम लोखंडे

पुस्तकाचे लेखक डॉ. विक्रम लोखंडे यांनी सांगितले की डॉक्टर अथवा सर्जन म्हणून काम करताना चुका करण्यास संधी नसते मात्र लिखाणात चूका सुधारण्याची संधी मिळते. यातून माणसाचे आयुष्य सुधारण्यास मदत होते.आपल्या अंतर्मनातील आवाज हा फक्त लिखाण किंवा वाचनानेच ऐकु येतो म्हणूनच मी पुस्तक लिखाणाचा निर्णय घेतला असे ‘वन पेज स्टोरी’पुस्तकाचे लेखक डॉ.विक्रम लोखंडे यांनी सांगितले.
कार्यक्रमास अंकुशराव कदम,साकेत भांड,समाधान लोखंडे,बेबीताई लोखंडे,आनंदराव लोखंडे, तारामती लोखंडे,डॉ.बी.आय.यादव,डॉ.मीरा यादव,प्रदीप आबा पाटील,जालना जिल्हा भाजपा उपाध्यक्ष भास्कर आबा दानवे,गोव्हर्नमेंट काँट्रॅकटर सुधाकरराव दानवे यांच्यासह नातेवाईक,तसेच सामाजिक,शैक्षणिक,साहित्यिक, राजकिय, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
